मसुचीवाडी छेडछाडीतील तिघांना दीड वर्षे कारावास-सडकसख्याहरी बोरगावचे : राज्यभर गाजले होते प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 21:35 IST2018-05-19T21:35:12+5:302018-05-19T21:35:12+5:30
गेल्या दोन वर्षापूर्वी राज्यभर गाजलेल्या मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अल्पवयीन शाळकरी मुलींच्या छेडछाड प्रकरणातील बोरगावच्या तिघा सडकसख्याहरींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरुन विविध

मसुचीवाडी छेडछाडीतील तिघांना दीड वर्षे कारावास-सडकसख्याहरी बोरगावचे : राज्यभर गाजले होते प्रकरण
इस्लामपूर : गेल्या दोन वर्षापूर्वी राज्यभर गाजलेल्या मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अल्पवयीन शाळकरी मुलींच्या छेडछाड प्रकरणातील बोरगावच्या तिघा सडकसख्याहरींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरुन विविध कलमांखाली १८ महिन्यांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली.
इंद्रजित ऊर्फ बंटी ऊर्फ रोहित प्रकाश खोत (वय २३), संग्राम ऊर्फ सागर प्रकाश खोत (२६) आणि अमोलसिद्ध ऊर्फ आप्पासाहेब नरसाप्पा बबलेश्वर (२४, तिघे रा. आण्णाचा मळा, मसुचीवाडी रोड, बोरगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या गाजलेल्या आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या खटल्यात फिर्यादीतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी विक्रम पाटील यांनी काम पाहिले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील १७ वर्षीय पीडित मुलगी ही आपला भाऊ आणि अन्य एका मैत्रिणीसमवेत इस्लामपूर येथे शिक्षणासाठी येत होती. हे तिघे दररोज मसुचीवाडी ते इस्लामपूर व परत असा बसने प्रवास करायचे. फेब्रुवारी २०१६ मध्ये एक दिवस मसुचीवाडी गावी जाणारी बस निघून गेल्याने हे तिघे बोरगावपर्यंत आले.
तेथे उतरल्यावर वडिलांना फोन करुन आम्हाला न्यायला या, असा निरोप देऊन ही पीडित मुलगी, तिचा भाऊ आणि मैत्रीण मसुचीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने चालत निघाले. गावापासून पुढे एक किलोमीटर अंतरापर्यंत चालत जात असताना बोरगाव हायस्कूलजवळ आल्यावर रोहित खोत, सागर खोत, आप्पा बबलेश्वर आणि राजेंद्र पवार असे चौघे दोन मोटारसायकलवरुन पाठीमागून आले. बबलेश्वर याने दुचाकी आडवी मारुन पीडित मुलीजवळ उभी केली. यावेळी पाठीमागे बसलेल्या रोहित खोत याने चल माझ्या गाडीवर बस, असे म्हणत मुलीचा हात धरुन जबरदस्तीने गाडीवर बसवू लागला. पीडित मुलीने विरोध केल्यावरही त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. भाऊ व मैत्रिणीला धमकावले. यानंतर या टोळक्याने पुन्हा ही पीडित मुलगी ज्या बसने प्रवास करायची, तिचा पाठलाग करु लागले. हा प्रकार मुलीने वडिलांना सांगितला. त्यांनी तिची समजूत काढली.
या संवेदनशील ठरलेल्या खटल्यात न्यायालयाने तिघा आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावली. कलम ३५४, ३५४ (अ) आणि ३५४ (ब) नुसार १८ महिने सक्षम कारावास आणि प्रत्येकी ६ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास २१ दिवस सश्रम कारावास. कलम ५०६ नुसार ६ महिने सश्रम कारावास प्रत्येकी ५०० रुपये दंड, दंड न दिल्यास ७ दिवस सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम १२ नुसार १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस सश्रम कारावास अशा शिक्षेचा समावेश आहे. तिघांना ही शिक्षा एकत्रितपणे भोगावी लागणार आहे. गुन्'ातील जप्त मोटारसायकल सरकारजमा करावी. तसेच यातील चौथा फरारी संशयित राजेंद्र पवार याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.